
डॉ शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.
पोलिसांची गस्त वाढवण्याची शेतकऱ्यांची मागणी.
सेलू : सेलू तालुक्यातील वालूरसह इतर खेड्या – पाड्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी आणि व्यावसायिक वास्तव्यास आहेत. या भागात शेतीचे प्रमाण लक्षणीय असून सध्या कापूस वेचणीचा हंगाम सुरू आहे. मात्र, काही भागांत हाताला काम आणि खिशात पैसे नसल्याच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत चोरट्यांनी शेतातील कापूस चोरी करण्याचा सपाटा लावला आहे.वालूर परिसरातील चोरटे रात्री-बेरात्री शेतात शिरून कापूस वेचणी करत असून रातोरात मोठ्या प्रमाणात कापूस लंपास करत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. या वाढत्या चोऱ्यांमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कष्टाने पिकवलेला कापूस डोळ्यादेखत चोरीला जात असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.या पार्श्वभूमीवर सेलू पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक आणि पोलिस कर्मचाऱ्यांनी वालूर शिवारासह खेड्या – पाड्यात रात्रीची व दिवसाची पोलिस गस्त वाढवावी, तसेच या भागात पोलिसांची गाडी नियमित फिरवण्यात यावी, अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.








